Sangli News : जयंत पाटलांच्या सासरवाडीतील मतदारांचा राष्ट्रवादीला दणका, मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या गावांमध्ये धक्कादायक असे निकाल समोर आले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनाही त्यांच्या सासरवाडीच्या गावकऱ्यांनी मोठा धक्का दिला आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपने तब्बल १५ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीला पराभूत केले आहे. म्हैसाळ ही जयंत पाटील यांची सासरवाडी आहे.

जयंत पाटील यांचे मेव्हणे मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने येथील निवडणूक लढवली होती. मात्र, लहान मेव्हणा, मोठ्या मेव्हण्याची पत्नी अन मुलगी हे सगळे पाहुणे पराभूत झाले. १७ पैकी १५ जागांवर भाजपने एकतर्फी विजय मिळवला तर राष्ट्रवादीला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. तथापि, या निवडणूका स्थानिक पातळीवरील असल्या तरी जयंत पाटील यांचे पाहुणे पराभूत झाल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे.

आशिष शेलार यांनी भाजपची लाज राखली
दुसरीकडे, सिंधुदुर्गात सावंतवाडी तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात भाजपला यश आले आहे. दांडेली या गावात भाजपचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांची सासरवाडी असून, दांडेली ग्रामपंचायत बरीच वर्षे शिवसेनेकडे होती. मात्र, यंदा ती ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे. आशिष शेलार यांनी स्वतः येथे प्रचार केला. त्यामुळे या ग्रामपंचायतवर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.