ही तर ठाणे, नवी मुंबई, मुंबई पालिकेतील विजयाची पायाभरणी : आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले यश हे नवी मुंबई, ठाणे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या विजयाची पायाभरणी आहे, असा दावा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलाय. सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता पूर्ण होत आलीय. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांना कडवी टक्कर देत भाजप हा मोठा पक्ष ठरलाय. या विजयानंतर भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय, असेही शेलार यांनी म्हंटलंय.

ग्रामपंयाचत निववडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर शेलार म्हणाले, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालंय. कोकणातील जनतेने भाजपला भरभरून पाठिंबा दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 45 ग्रामपंचायतींत भाजपचा विजय झालाय. तर केवळ 20 ठिकाणी शिवसेना जिंकलीय. रत्नागिरीत सुमारे 536 ग्रामपंचायत सदस्य विजयी झालेत. जिलेबी फाफडाचे राजकारण करू पाहत होते, नौटंकी करू पाहत होते. त्याला मालवणी खाजाने उत्तर दिलंय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे केवळ भाजप याचा अर्थ आता नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीत केवळ भाजपचाच झेंडा फडकणार आहे, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय.

कणकवली विधानसभा मतदारसंघात 39 पैकी 27 तर सावंतवाडी 16 पैकी 9 तसेच कुडाळ 15 पैकी 9 अशा एकूण 70 पैकी भाजपने 45 ग्रामपंचायती जिंकल्यात, तर शिवसेनेला 20 आणि राष्ट्रवादीला 1 ग्रामपंचायत जिंकता आलीय. सिंधुदुर्गात भाजपचाच आवाज!, कोकण म्हणजे आम्हीच म्हणणार्‍यांचे कोकणी माणसाकडून गर्वहरण झाले आहे, असा टोला देखील शेलार यांनी शिवसेनेला हाणलाय.