महाविकास आघाडी ‘या’ ग्रामपंचायतीसाठी वेगवेगळं लढली, बहुमतापासून तिन्ही पक्ष लांबच

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहेत. त्यातच पाथरी तालुक्यातील उमरा ग्रामपंचायतीसाठी राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील ( mahavikas aghadi ) शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र, आज लागलेल्या निकालानंतर मतदारांनी तीनही पक्षांना बहुमतापासून दूर ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

उमरा ग्रामपंचायतीतील ९ जागांसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत झाली. यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष कोल्हे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सत्तेत असणारे पक्षचं भिडत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष येथील निकालाकडे लागले होते.

पण, हाती आलेल्या निकालानुसार मतदारांनी कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत दिले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ४, शिवसेना ३ आणि काँग्रेसला २ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीमधील आपसात लढत असलेल्या तीनही पक्षाच्या उमेदवारांना मत देत कोणत्याच पक्षाला नाराज केले नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात झाला. आता सरपंच पदाचे आरक्षण सोडत निघाल्यावर येथे सुद्धा गावाच्या विकासासाठी तीनही पक्ष एकत्र येणार का? अशी चर्चा चालू आहे.