ग्रामपंचायतीच्या निकालात महाविकास आघाडीची मुसंडी, अजित पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्यातील सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सुरूय. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीमधील पक्षांनी चांगली कामगिरी केलीय. महाविकास आघाडीतील पक्षांनी पुरस्कृत केलेले उमेदवार विजयी ठरू लागल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आपली प्रतिक्रिया दिलीय. राज्यात महाविकास आघाडीची चलती आहे, असे अजित पवार यांनी म्हटलंय.

यावेळी अजित पवार म्हणाले, ग्रामपंचायतीच्या स्थानिक निवडणुकांच्या नियोजनाची जबाबदारी आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांकडे सोपवली होती. त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवलीय. महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचीच चलती दिसून आलीय. त्यासाठी मी या कार्यकर्त्यांचं कौतुक करतोय.

आज मतमोजणी सुरू असलेल्या ग्रामपंचायतींत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला घवघवीत यश मिळालंय. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर, तर भाजपा दुसर्‍या आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिसर्‍या आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, आज शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारला स्वारस्य राहिलेले नाही. 8-10 वेळा झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्यात. हा एकप्रकारे शेतकर्‍यांचा अपमान आहे. शेतकरी लाखाचा पोशिंदा असून त्याच्याबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्दैवी आहे. त्यामुळे केंद्राचा निषेध करतो, अशा शब्दांत पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.