महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री देणार्‍या गावात भाजप ‘सुसाट’ ! बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी भुईसपाट

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत यवतमाळमध्ये भाजपनं मुसंडी मारलीय. काँग्रेसच्या 2 दिग्गज माजी मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये भाजपनं एकतर्फी विजय मिळवलाय. यवतमाळमधील पुसद तालुक्यातील गहुली ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आलीय. गहुली हे वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या दोन दिवंगत मुख्यमंत्र्यांचं गाव असल्यामुळे हा विजय भाजपसाठी महत्त्वाचा आहे. गहुली ग्रामपंचायती मध्ये बराच काळ राष्ट्रवादीची सत्ता होती. पण, यंदा भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात धडक दिलीय. विधानपरिषदेतील आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली गहुलीमध्ये भाजपने सरशी साधलीय.

1949 पासून गहुलीत बिनविरोध निवडणूक झाल्यात. मात्र, यंदा भाजपने राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का दिलाय. भाजपने 7 पैकी 7 जागा जिंकत राष्ट्रवादीला धक्का दिलाय. भाजपच्या विजयात निलय नाईक यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंद्रनिल नाईक यांचं आव्हान होतं. इंद्रनिल हे निलय यांचे चुलत बंधू असून हे दोघेही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील आहेत.

जाणून घ्या, कोण आहेत निलय नाईक?
निलय नाईक यांनी ऑगस्ट 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतून भाजपमध्ये प्रवेश केलाय. जुलै 2018 मध्ये भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं. निलय नाईक यांनी 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवलीय. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघ मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय. नाईक परिवार राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ मानला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे हे घराणं आहे.