’या’ ग्रामपंचायतीत ना भाजप, ना महाविकास आघाडी; रामदास आठवलेंचा गटच भारी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे आज निकाल जाहीर होत आहेत. एकूण 6 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींत कमळ फुलेल, असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जातोय. तर, महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांनी आपले गड कायम राखले जात आहेत. मात्र, सोलापुरमधील एका ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंच्या गटाने यश मिळवलंय.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अक्कलकोट तालुक्यामधील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं पॅनल उतरवलं होतं. विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रिपाईंने ही निवडणूक लढवलीय. गायकवाड यांनी या निवडणुकीचं नियोजन केलं होतं. घरोघरी जाऊन प्रचार करताना येथील मतदारांच्या समस्याही गायकवाड यांनी जाणून घेतल्या. त्यामुळे रिपाईंचं पूर्ण पॅनल विजयी झालंय. बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीतील 7 पैकी 7 जागा गायकवाड पॅनलला मिळाल्यात. रिपाईंच्या या यशानं स्थानिक आघाडीतील काँग्रेस, भाजप सर्वपक्षीय गटांना धक्का बसलाय.

सोलापूर जिल्ह्यातील एकूण 657 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यापैकी 67 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर, 7 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळालीय. त्यामुळे उर्वरीत 587 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडलंयं. सोलापुरातील उरलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे आठवले गट बॅगेहळ्ळीत निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं विशेष लक्ष होतं.