‘महाविकास’च्या माध्यमातून ग्रामीण भागांत शिवसेनेची जोरदार ‘मुसंडी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात ग्रामपंचायत निवडणूक निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यामध्ये शिवसेनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत मारलेल्या मुसंडीनं त्याचीच प्रचिती आली आहे .भाजपपासून बाजूला होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेनं आता ग्रामपंचायत निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात शिवसेनेनं आपली बाजी मारली आहे. विशेष म्हणजे पाटील यांनी शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होती. मात्र तरीही खानापूरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकरांनी खानापूरमध्ये पाटलांना शह दिला. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर गावात शिवसेनेनं राष्ट्रवादीला धक्का दिला. पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या खेड शिवापूरमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांच्या पॅनेलनं ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवला.

तसेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे, घरनिकी, तळेवाडी, लेंगरेवाडी, देशमुखवाडी आणि धावडवाडी या ग्रामपंचायती तर खानापूर तालुक्यातील माहुली, नागेवाडी, खंबाले, पारे, रेणावी, देवेखिंडी, भडकेवाडी आणि दंडुळगाव या ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत. यामध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी ल्हासुर्णे, मंगळापूर, किन्ही आणि कटापुर या ग्रामपंचायती नव्याने जिंकल्या आहेत. मराठवाडा आणि कोकणात शिवसेनेची चांगली ताकद आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची पक्षसंघटना फारशी मजबूत नाही. परंतु आता महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष आणि त्यातही मुख्यमंत्रिपद असल्यानं शिवसेनेनं पश्चिम महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संघटनेचा फायदा अनेक ठिकाणी शिवसेनेला झाला असल्याचे दिसून येत आहे.