हिरवे बाजारमध्ये झाली 30 वर्षांनंतर निवडणूक, ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आदर्श गाव अशी ओळख असलेल्या हिवरेबाजार येथील ३० वर्षांनी बिनविरुद्ध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा खंडित झाली होती. मात्र, आता हाती आलेल्या आकडेवारीनुसार पद्मश्री पोपटराव पवार यांची हिवरेबाजार ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने सातही जागांवर विजय मिळवलेला आहे.

पोपटराव पवार यांच्यामुळे १९९० पासून गावात बिनविरुद्ध निवडणुकीची परंपरा सुरु झाली होती. तेव्हापासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही. परंतु, यंदा प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे गेले. मतदानाच्या दिवशी मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. यावेळी निवडणूक बिनविरुद्ध होत नसली, तरी निवडणूक कशी असावी याचा सुद्धा आदर्श घालून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पोपटराव पवार यांनी केले होते.

गावातील किशोर संबळे यांनी पोपटराव पवार यांच्याविरोधात पॅनल उभा केल्याने निवडणूक बिनविरुद्ध होऊ शकली नाही. त्यामुळे यंदा मतदान झाले आणि ग्रामस्थांनी उत्साहात त्यात सहभाग नोंदवला. लोकसभा, विधानसभेची निवडणूक सोडली तर ‘ईव्हीएम’ आल्यापासून गावात झालेली पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक ठरली.

१२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका लागल्या होत्या. त्याचे आज निकाल हाती येणार असून, लाखो उमेदवारांसोबत नागरिकांना त्याची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले होते. मतमोजणीला सुरुवात झाली असल्याने सायंकाळी ५ पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.