Coronavirus in Maharashtra : राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये कोरोनानं पुन्हा काढलं डोकं वर, मुंबई-पुण्याबाहेर नवे हॉटस्टॉप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दोन आठवड्यांत या जिल्ह्यांत दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत वेगाने वाढ होत आहे. १० दिवसांपूर्वी २१ जिल्ह्यांत दिसत असलेलं हे चित्र आता २८ जिल्ह्यांत दिसू लागलं आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांमधली रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Coronavirus Maharashtra Updates) पुन्हा वाढ होत असल्याचं चित्र हां हां म्हणताना राज्याच्या 36पैकी 28 जिल्ह्यांत दिसू लागलं आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून राज्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं स्पष्ट होत आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ आदी ठिकाणी नवे हॉटस्पॉट्स बनत चालले आहेत. मुंबईच्या तुलनेत नागपुरात नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण अधिक असल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. मुंबईची लोकसंख्या १३० लाख, तर नागपूरची लोकसंख्या ५० लाख आहे. नवे रुग्ण सापडण्याचं राज्यातलं सर्वांत जास्त म्हणजे ४१.५ टक्के प्रमाण अमरावतीत आहे. फेब्रुवारीत आलेल्या लाटेचा केंद्रबिंदू विदर्भात असून, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे आणि अमरावती या ठिकाणीही रुग्णसंख्या वाढत आहे. या पाच जिल्ह्यांतल्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या राज्यातल्या एकूण सक्रिय कोरोनाबाधितांच्या सुमारे ६५ टक्के एवढी आहे.

शुक्रवारी मुंबईत १०३४ नवे कोरोनाबाधित आढळले, तर तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख २३ हजार ८७७ झाली, तर मृतांची संख्या ११ हजार ४६१ वर पोहोचली. मुंबईत १०००हून अधिक नवे रुग्ण सापडण्याचा शुक्रवार हा सलग तिसरा दिवस होता. बुधवारी ११४५, तर गुरुवारी ११६७ नवे कोरोनाबाधित आढळले होते. नागपुरात शुक्रवारी १०७४ नवे रुग्ण आणि सहा मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता १ लाख ४७ हजार ९०५ झाली असून, मृतांची संख्या ४३२० झाली आहे.

राज्य पातळीवरील एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि औरंगाबादमध्येही एक फेब्रुवारीपासून रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला तपासण्यांची संख्या वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असंही त्या अधिकाऱ्याने सांगितलं. बृहन्मुंबई महापालिकेच्या (BMC) माहितीनुसार, रोजच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याचा दर १८ फेब्रुवारीला ०.१७ टक्के होता, तो आता ०.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसंच, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ४१७ दिवसांवरून २५६ दिवसांवर आला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, १५ ते २१ फेब्रुवारी या आठवड्यात रुग्णवाढीचा सर्वाधिक दर अमरावतीत १९.४ टक्के एवढा होता. अकोल्यात तो १०.५ टक्के, तर बुलढाण्यात ६.१ टक्के होता.