Coronavirus : महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं केंद्र सरकारदेखील चिंतेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात आढळून येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाला सहजतेने घेऊ नका, असे आवाहन केंद्र सरकारने राज्य सरकारला केले आहे. महाराष्ट्रात नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. देशाला कोरोनामुक्त करायचे असेल तर सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज असल्याचे निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्ही. के पॉल म्हणाले की, महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनामुळे आम्ही फार चिंतेत आहोत. महाष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असून, हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांनी सहजतेने न घेता काळजी घ्यावी. तसेच कोरोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावेच लागेल, असेही पॉल यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी यामध्ये नवीन प्रकाराचा संसर्ग कोठेही दिसून आलेला नाही. हा प्रादुर्भाव चाचण्यांची संख्य कमी, बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा आणि त्यांचा शोध घेण्यामध्ये असलेली उणीव यामुळे महाराष्ट्रात संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.

महाराष्ट्रात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना महाराष्ट्रात याचा वेग जास्त आहे. देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात सध्या एक लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मध्य प्रदेश, हरयाणा आणि गुजरातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या राज्यांसोबत बैठका घेऊन त्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

देशात गेल्या 24 तासांमध्ये 22 हजार 854 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 13 हजार 659 रुग्ण आढळून आले आहेत. म्हणजे देशात आढळून येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रातील 60 टक्के रुग्ण आहेत. यानंतर केरळ, पंजाब, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरियाणा या राजांचा नंबर लागतो. सध्या देशामध्ये 1 लाख 89 हजार 226 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 1 लाख रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.