Coronavirus : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली मोठी माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पाश्चिमात्य देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, बऱ्याच ठिकाणी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. तर दिल्लीत तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या अनुषंगाने टाळेबंदीची चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावरती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यात येणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचे स्पष्ट केलं आहे.

जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. ते म्हणाले, “टाळेबंदी लागू करण्यात येत नसली तरी बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालण्याने शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येतील. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल. सामाजिक अंतराचे पालन होत नसल्याने कठोर भूमिका घ्यावी लागणार असल्याचे,” त्यांनी सांगितलं.

“कोरोनाचा प्रसार वाढत असून, उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्याचा राज्य सरकार कसलाही विचार करत नाही. दिवाळी खरेदीसाठी इतर वेळेही बाजारपेठांत होत असलेली गर्दी, चौपाट्या, समुद्रकिनारे व इतर पर्यटनस्थळी, सार्वजनिक ठिकाणी वाढत चाललेली गर्दी याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे,” त्यांनी म्हटलं.

“पर्यटन व सार्वजनिक ठिकाणी नियम न पाळता विनाकारण फिरणाऱ्यांना रोखणे, शाळा-महाविद्यालयात कोरोना प्रतिबंध उपाय करणे, सार्वजनिक ठिकाणी अनिर्बंधमुक्त वावर नियंत्रित करणे, विवाह व अन्य समारंभांसाठी २०० वरून ५० नागरिकांना हजर राहण्याची मुभा देणे, मुखपट्टी, न वापरणाऱ्यांना दिल्लीच्या धर्तीवर अधिक दंड आकारणे, या सर्व विषयांवर मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.