Lockdown बाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले स्पष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   टाळेबंदीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. आता आपण सेफ झोनमध्ये आहोत. महाराष्ट्रात समाधानकारक परिस्थिती आहे. जगाच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. तरीसुद्धा नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितलं.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंगळवारी राजेश टोपे यांनी मुंबईत वार्ताहरांशी संवाद साधला. ते म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यात आला. तसेच कोरोनाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याचे त्यांनी सांगितलं.

राज्यात चाचण्यांवर भर देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर कोरोना स्थितीसंदर्भात चर्चा करण्यात आली. भारतात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती उत्तम असून, जिल्हाधिकाऱ्यांना यापुढे टार्गेट देण्यात येणार आहे. प्रत्येकी दहा लाख लोकांच्या मागे चाचण्या वाढल्या पाहिजे. याबाबतची अधिसूचना आजच काढण्यात येत आहे. राज्यात चाचण्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. आरटीपीसीआर चाचण्या ७५ टक्के असल्या पाहिजेl, असेही टोपे यांनी नमूद केलं.

देशात ५ व्हॅक्सिन प्रगतिपथावर

लसीकरणाबाबत सखोल चर्चा करण्यात आली असून, देशात ५ व्हॅक्सिन प्रगतिपथावर आहेत. देशातील ३० कोटी नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करायचे आहे. काही व्हॅक्सिनचे २ डोस, तर काहींचे ३ डोस घ्यावे लागणार आहेत. परिणाम आणि कालावधी हा महत्त्वाचा भाग आहे, तर व्हॅक्सिन उणे २० डिग्रीमध्ये ठेवावे लागतील. केंद्र सरकार पूर्णपणे लसीकरण कार्यक्रम राबवणार आहे.

टाळेबंदी संदर्भात चर्चा नाही…

साथीच्या रोगाच्या ३ लाट असतात. मात्र, दुसरी आणि तिसरी लाट येऊन जाते तेव्हा रुग्णांची संख्या शून्यावर जाते. परंतु, देशात असे कुठेच दिसत नाही. नागरिकांना आवाहन आहे त्यांनी (SOP) चे पालन करावे. गुजरातमध्ये शाळा सुरू करून आता त्या बंद कराव्या लागल्या. तशी परिस्थिती आपल्याकडे उद्भवू नये म्हणून काही सुरक्षा निर्बंध लादले जाऊ शकतात. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी टास्क फोर्स बनवण्यात आली असल्याचे, टोपे म्हणाले.

कोरोनाबाबत मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, लॉकडाऊन संदर्भात आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती