गुप्तेश्वर पांडेंचं तिकीट कापल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांनी साधला निशाणा, म्हणाले – ‘आमच्या प्रश्नांना घाबरलं भाजप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्याकडून निवडणूक लढविण्याचा अंदाज वर्तविला जात होता, परंतु बुधवारी आपण निवडणूक लढवत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर कडक शब्दांत बोलताना म्हटले आहे की,तिकीटाबाबत आम्ही प्रश्न विचारू या भीतीपोटी पांडे यांना तिकीट दिलं गेलं नाही.

देशमुख म्हणाले, गुप्तेश्वर पांडे यांना निवडणुकीचे तिकिट देणे ही पक्षाची बाब आहे, आम्ही विचारले होते की, भाजपा नेते त्यांच्यासाठी प्रचार करतील का ? या प्रश्नाच्या भीतीमुळे कदाचित त्यांचे तिकीट नाकारले गेले असेल.

माजी डीजीपी हितचिंतकांना म्हणाले – संयम बाळगा

त्याचवेळी बुधवारी माजी डीजीपींनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले की, ‘अनेक हितचिंतकांच्या फोनमुळे मी अस्वस्थ आहे. मला त्यांची चिंता आणि त्रास देखील समजताे आहे. माझ्या सेवानिवृत्तीनंतर सर्वांनी अशी अपेक्षा केली होती की मी निवडणूक लढवीन, परंतु यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवित नाही. निराश होण्यासारखे काही नाही, धीर धरा. ‘

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षा जनता दल (युनायटेड) ने बुधवारी अंतिम यादी जाहीर केली. या यादीमध्ये जेडीयूने बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट दिले नाही. त्यांनी नितीशकुमार यांच्या पक्षात जाण्यासाठी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. मात्र हा मतदारसंघ भाजपच्या कोट्यात गेलेला असल्याने, बक्सर येथून विधानसभा निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसत आहे. बक्सर जिल्ह्यातील राजपूर आणि डुमरांव येथे जेडीयूच्या दोन विधानसभा जागा आहेत, तर उर्वरित दोन, बक्सर आणि ब्रह्मपूर, भाजपमध्ये गेल्या आहेत.