लॉकडाऊनमध्ये वाढतोय ‘सायबर क्राईम’, अफवा पसरवणार्‍यांना सोडणार नाही : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई :  पोलीसानामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागू केल्यानंतर सायबर क्राईमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. फेसबुक, ट्विटर, टिक टॉक यासारख्या फ्लॅटफॉर्मवर चुकीच्या पोस्ट टाकल्या जात आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे सायबर सेल अशा लोकांवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, सोशल मीडियावर महिलांविरुद्ध चुकीची टिप्पणी केली जात आहे. तसेच समाजात फूट पडेल असे लिखाण केले जात आहे. चुकीचे व्हिडिओ टिकटॉकवर पोस्ट केले जात आहेत. ज्यामुळे बलात्कारासारख्या गुन्ह्यास प्रोत्साहन मिळते. अशा प्रकारचे पोस्ट किंवा टिप्पणी करणाऱ्या लोकांवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, अलीकडच्या काळात अशा प्रकारची प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये चुकीचे व्हिडिओ आणि बातम्या पोस्ट केल्या जात आहेत. हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश, दिल्ली मध्येही पहायला मिळत आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक लागतो. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 2940 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44582 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 1517 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात देखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात देशात 6654 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 25 हजार 101 इतकी झाली आहे. देशात कोरोनामुळे 3720 लोकांचा मृत्यू झाला असून 69557 अॅक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 51784 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

You might also like