‘ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरु असेल त्या संबधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई’ – गृहमंत्री देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य रवींद्र फाटक व महादेव जानकर यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री देशमुख बोलत होते.

गृहमंत्री देशमुख म्हणाले की, राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अंमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असेल त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिला आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 11 ठिकाणी छापे टाकून 42 लोकांवर कारवाई केली. वरळीतील पबमध्ये झालेली गर्दी व कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करून त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत लावलेली उपस्थिती व तेथे कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले.