नागपूरात बंदचे आदेश झुगारून सुरु होतं हॉटेल, गृहमंत्र्यांनी छापा टाकून केली कारवाई

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, नागपूरमधील दोन हॉटेल राज्य शासनाचे आदेश झुगारून सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. गृहमंत्र्यांनी या दोन हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर गृहमंत्र्यांनी गुरुवारी या हॉटेलवर कारवाई करून परिसराची पाहणी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही शहरातील काही हॉटेल सुरू होते. नागरिकांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: शहरातील बर्डी भागातील दुकानावर छापा टाकला. काही मेडिकल स्टोअर्समध्येही कारवाई केली. तसेच अनिल देशमुख यांनी नागपूरमधील प्रसिद्ध असलेल्या दोन हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमधून चिकन, मटणाने भरलेले मोठाले पातले आढळून आले. यावेळी अनिल देशमुख यांनी हॉटेलमधील बिलं ताब्यात घेत कारवाईचे आदेश दिले. हॉटेल बंद करण्याचे आदेश असतानाही हॉटेल सुरू ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली.

कल्याण-डोंबीवली महापालिकेकडून कारवाई
दरम्यान, कल्याण-डोंबीवली महापालिकेने राज्य शासनाच्या आदेशानुसार कल्याण आणि डोंबीवली परिसरातील 11 दुकानांवर कारवाई केली. राज्य शासनाचा आदेश न पाळता दुकानदारांनी दुकानं सुरू ठेवली होती. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बाजार पेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यामधून जिवनावश्यक वस्तू म्हणजे दूध, किराणा आणि मेडिकल स्टोअर्स यातून वगळ्यात आले आहेत. महापालिकेकडून दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तरी देखील दुकानदारांनी दुकाने सुरू ठेवली होती. अखेर पोलिसांनी रस्त्यावर उतरून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली.

नाशिकमध्ये लॉन मालकांवर कारवाई
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी कमी करावी यासाठी राज्य शासनाने गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील नाशिकमध्ये The Epidemic Diseases act 1897 लागू असताना लॉन मालकांनी लग्न आणि वाढदिवसासाठी लॉनमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे पोलिसांनी काही लॉन्सवर कारवाई केली.

शनिवार-रविवार रिक्षा-टॅक्सी बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील कलमनूरी परिसरातील हेअर कटिंग सलूनची सर्व दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोकण विभागातील रिक्षा-टॅक्सी महासंघाने मुंबई परिसरातील कल्याण, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी रिक्षा-टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.