घातपातासाठी पेरुन ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली जप्त, नक्षलवाद्यांचा डाव फसला

गोंदिया : गेंडुरझरीया जंगल परिसरात घातपात करण्यासाठी नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेली स्फोटके शोधण्यात सालेकसा पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे मोठा घातपात टाळता आला आहे. २७ इलेक्ट्रीक डेटोनेटर, १५० स्फोटक कांड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या दरेकसा घाटाजवळील गेंडुरझरीया पहाडी जंगल परिसरात घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरुन ठेवली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या नेतृत्वाखाली सी ६० सालेकसा येथील कमांडो पथक, बी़ डी़ डी़ एस पथक, सालेकसा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी गेंडुरझरीया पहाडी जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबविले. त्यात पहाडी उतार भागात दगडाच्या कोपर्‍यामध्ये श्वान पथकाला ही स्फोटके आढळून आली. एका स्टीलच्या डब्ब्यात २० किलोग्रॅम वजनाच्या सिल्वर व नारंगी रंगाच्या १५० स्फोटक कांड्या व २७ इलेक्ट्रीक डेटोनेटर असे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत सालेकसा पोलीस ठाण्यात भारतीय स्फोटक पदार्थ कायदा अन्वये नक्षलवाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या स्फोटकाचा वापर करुन पोलिसांच्या वाहने उलटविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता होती.