शेतकरी आंदोलनावर सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटच्या चौकशीचे आदेश, राज्य गुप्तचर खातं करणार तपास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केलं आणि देशभरात एकच चर्चा सुरु झाली. यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटिंनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसं होऊ देऊ का असं आवाहन करण्यात आले होते. मात्र, यावेळी काही सेलिब्रिटींचं ट्विट हे समान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यादरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी या आंदोलनाबाबत माजी पॉर्न स्टार मिया खिफा, आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना यांनी ट्विट करत जगाचे लक्ष वेधून घेतले. मात्र आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी यामध्ये उतरल्यानंतर देशाची सार्वभौमत्त्वाची बाजू पुढे करत भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यासह अक्षय कुमार, सायना नेहवाल पर्यंत अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडू यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सधर्म्य असल्याने काँग्रेस नेत्यांनी ही बाब ठाकरे सरकारच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विटची चौकशी करण्याचे आदेश दिले असून हा तपास राज्याच्या गुप्तहेर विभागाकडून केला जाणार आहे.

झूम मिटिंगदरम्यान काँग्रसकडून सेलिब्रिटींचा ट्विटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सेलिब्रिटींवर दबाव टाकण्यात आला होता याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. त्यावर अनिल देशमुख यांनी गुप्तहेर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी खासकरुन अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटचा उल्लेख करण्यात आला. दोन्ही ट्विटमध्ये असणाऱ्या साधर्म्य आश्चर्यकारक असल्याचे सांगण्यात आले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सचिन सावंत म्हणाले, कोणीही व्यक्तिगत पातळीवर मत व्यक्त करत असेल तर त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र ट्विटची वेळ, भाषा पाहिली तर हे भाजपच्या स्क्रिप्टनुसार करण्यात आलं का ? याबाबत शंका निर्माण होते. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांच्या ट्विटमधील शब्द समान आहेत. सुनील शेट्टीच्या ट्विटमध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे भाजपच्या स्क्रिप्टप्रमाणे हे करण्यात आलं का ? ही शंका निर्माण होते.