कडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक

वृत्तसंस्था –  राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी चौघांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यांचे प्रजनन करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने कोट्यावधी रूपयांची फसवणूक करण्यात आली होती.

कडकनाथ कोंबड्यांची प्रजाती ही प्रामुख्याने मध्य भारतात म्हणजेच मध्यप्रदेश आणि छत्‍तीसगड मध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. कडकनाथ कोंबड्यांना पोषण आणि चिकित्सकीय मुल्यांमुळे ओळखलं जात. कडकनाथ कोंबड्यांचं चिकन प्रति किलो 900 रूपयांना विकले जाते.

आरोपींचा एका नेत्याशी संबंध, शेतकर्‍यांचा आरोप
महारायत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यांची संख्या वाढविण्याची आणि नंतर कोंबड्यांना खरेदी-विक्री करण्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. कंपनीचं मुख्य कार्यालय सांगलीमध्ये आहे. आरोपींचा एका नेत्याशी संबंध असल्याचा आरोप देखील शेतकर्‍यांनी केला आहे.

घोटाळा नेमका किती रक्‍कमेचा याचा तपास पोलिस करतायत
वृत्‍तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कंपनीविरूध्द आत्‍तापर्यंत सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, पालघर, नाशिक आणि औरंगाबादमध्ये विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलिस घोटाळ्यात नेमक्या किती रक्‍कमेची फसवणूक झाली आहे याचा तपास करीत आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांची 550 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी याप्रकरणी ईडीकडून चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली आहे.

पुणे पोलिसांनी सांगलीतील कंपनीचे संस्थापक संचालक सुधीर मोहिते, इतर संचालक हनुमंत जगदाळे आणि संदीप मोहिते यांच्याविरूध्द साधारण 100 हून अधिक शेतकर्‍यांची 3 कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या महिन्याच्या सुरवातीलाच गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगलीच्या इस्लामपूर पोलिस ठाण्यात कंपनीचे संचालकांविरूध्द साडेचार कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तक्रारदार निलेश ए. यांनी कंपनीत अडीच लाखाची गुंतवणूक केली होती. कंपनीनं सांगितल्या प्रमाणे वायदा पूर्ण केलेला नाही.

दरम्यान, आत्‍तापर्यंत सुधीर मोहिते, संदीप मोहिते, हनुमंत जगदाळे आणि प्रितम माने यांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहिते आणि जगदाळे यांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे.

You might also like