महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद पेटल्याने बससेवा ‘बंद’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र – कर्नाटक राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. त्यामुळे कोल्हापूरहून कर्नाटकात जाणाऱ्या  आणि कर्नाटकातून कोल्हापूरात येणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत. सीमा प्रश्नावरुन सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी पहाटेपासून ही सर्व बससेवा बंद करण्यात आली आहे. सीमा प्रश्न पेटल्यानंतर दोन्ही बाजूंकडून सर्व प्रथम बसगाड्यांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागात दररोज १ हजार २०० हून अधिक बसगाड्या धावत असतात. या बंदमुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत आणि समस्त बेळगावकर सीमावासियांच्या वतीने चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा रविवारी २९ डिसेंबर रोजी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार अनगोळ येथील आदर्श मल्टिपर्पज सोसायटीच्या सभागृहात दुपारी ३ वाजता होणार आहे. हा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा कन्नड रक्षण वेदिका संघटनेने दिला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला होता. त्याला जशास तसे उत्तर देताना कोल्हापूरात सेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले होते. तसेच पुतळ्याला काळी शाई फासली.

महाराष्ट्रात अथवा कर्नाटकात सत्ताबदल झाला की काही दिवसांनी सीमा वाद दरवेळी पेटविला जातो. कर्नाटकातील नेते वादग्रस्त वक्तव्य करुन या वादाला सुरुवात करुन दिली जाते. त्याला कोल्हापूरातील शिवसैनिक तातडीने प्रतिउत्तर देत आले आहेत. आताही असे घडले आहे.

कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र  कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य करुन या वादाला तोंड फोडले होते. त्यातून कर्नाटक राज्याच्या बसवर कोल्हापूरात दगडफेक झाली होती. आज बेळगावातील सत्काराच्या कार्यक्रमामुळे वाद चिघळण्याची शक्यता असल्याने बस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/