‘वायदा’ आणि ‘रक्कम’ वेगवेगळी, महाराष्ट्र केसरी विजेत्याचे प्रशिक्षक काका पवारांचा ‘आरोप’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात नुकतीच बालेवाडीमधील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने यात बाजी मारली. हर्षवर्धनचा प्रतिस्पर्धी शैलेश शेळके हा त्याच्याच तालमीतला मल्ल आहे. दोन्ही मल्ल काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते. शैलेशवर 3-2 अशी मात करत हर्षवर्धनने मानाची गदा पटकावली. स्पर्धा संपली असली तरीही विजेत्यांना मिळणाऱ्या पुरस्काराबद्दल घोळ असल्याचं दिसत आहे. कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी याबाबत गंभीर आरोप केला आहे.

पुण्यात झालेली ही स्पर्धा अमनोरा आणि राज्य कुस्तीगीर परिषद यांनी आयोजित केली होती. सर्व गटातील विजेत्यांना स्पर्धेआधी ठरल्याप्रमाणे अमनोरातर्फे रोख बक्षिस जाहीर करण्यात आलं. यात सुवर्णपदक विजेत्याला 20 हजार, रौप्यपदक विजेत्याला 10 हजार आणि कांस्यपदक विजेत्याला 5 हजारांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. परंतु महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लाला दीड लाखांचं तर उपविजेत्या मल्लाला 75 हजारांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं अशी माहिती प्रशिक्षक काका पवार यांना दिली आहे.

काका पवार म्हणाले…

कुस्ती प्रशिक्षक काका पवार याबाबत बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लाला दीड लाखांचं तर उपविजेत्या मल्लाला 75 हजारांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. आम्हाला विजेत्या खेळाडूंना खूप पैसे मिळतील असं सांगण्यात आलं होतं. परंत हर्षवर्धनला मात्र 20 हजारांहून अधिक एक पैसाही देण्यात आलेला नाही” असा गंभीर आरोप काका पवारांनी केला.

कुस्तीगीर परिषद काय म्हणते ?

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे याबाबत बोलताना म्हणाले, “2 ते 7 जानेवारी 2020 दरम्यान श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा सर्व खर्च यंदा पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक सिटी कॉर्पोरेशनने उचलला होता. ज्यामध्ये प्रत्येक वजनी गटातील सुवर्ण पदक विजेत्यास 20 हजार, रौप्य पदक विजेत्यास 10 हजार व कांस्य पदक विजेत्यास 5 हजार रोख बक्षिस देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे स्पर्धेदरम्यान झालेल्या प्रत्येक बक्षिस समारंभात बक्षिसाची रक्कम अदा करण्यात आली आहे. स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी विजेता व उपविजेता मल्लास त्या व्यतिरीक्त कोणत्याही प्रकारची बक्षिसे जाहीर करण्यात आलेली नव्हती. यासंबंधीची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती.” असे ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/