पावसाळी अधिवेशन ! ‘कोरोना’ टेस्ट Positive आल्यास आमदारांना विधीमंडळात प्रवेशबंदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   येत्या 7 आणि 8 सप्टेंबर रोजी राज्यात विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदार अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. याशिवाय दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनसाठी चाचणी केल्यानंतर ज्या आमदाराची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह येईल त्यांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठका आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत सुरक्षाविषयक मापदंडाचे पालन करून अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत या बैठकांमध्ये चर्चा करण्यात आली. या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी (दि 6 सप्टेंबर) सर्व सदस्यांची कोरोनासाठीची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येईल असा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. ज्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह येईल अशा सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. सोशल डिस्टेंसिंगचं पालन व्हावं यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून सदस्यांना सुरक्षा किट दिलं जाणार आहे. यात फेस मास्क, फेस शील्ड, हँड ग्लोव्ह्ज, सॅनिटायजर अशा वस्तूंचा समावेश असणार आहे.

सदस्यांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. स्वीय सहायक आणि सदस्यांच्या वाहनचालकांची बसण्याची आणि अल्पोपहार आदीची व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू (टेंट) टाकून करण्यात येणार आहे. सहव्याधी असलेल्या ( कोमॉर्बिडीटी) सदस्यांना काळजी घेण्या बाबतच्या सूचना संबंधित पक्षाच्या गटनेत्याकडून दिल्या जाणार आहेत.

या अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा होणार आहे. याशिवाय अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा केली जाणार आहे. यात 7 शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयक यांचा समावेश असणार आहे. विधानमंडळ सचिव अ‍ॅड राजेंद्र भागवत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

कामकाज सल्लागार समिती बैठकांना विधानसभा सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, अ‍ॅड आशिष शेलार, अमिन पटेल, सुनील प्रभू, विधान परिषद सदस्य सर्वश्री डॉ रणजीत पाटील, अशोक उर्फ भाई जगताप, विजय उर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, कपिल पाटील आदी उपस्थित होते.