Coronavirus : कोणत्याही ‘कोरोना’ योध्यांवर होणारे हल्ले खपवून घेणार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा सामना करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर, नर्स अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती पोलिसांवर हल्ला करत आहेत. पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही, अशा हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोरोना संदर्भातील 81 हजार गुन्ह्याची नोंद झाली आहे. तसेच पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना 159 घडल्या. या घटनांमध्ये 535 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊन दरम्यान म्हणजेच 22 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत कलम 188 नुसार 81063 गुन्हे नोंदवण्यात आले असून 16548 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 85 लाख 50 हजार 394 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलीस विभागाच्या 100 या क्रमांकावर लॉकडाऊनच्या काळात 79901 दूरध्वनी आले. त्यावर प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्यावर हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे, अशा 618 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. राज्यात एकूण 155076 व्यक्ती क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1107 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 49113 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे नोंदवण्यात आले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.