Lockdown : नीतेश राणेंची ‘कमळ थाळी’ गरिबांसाठी मोफत !

सिंधुदुर्ग : पोलिसनामा ऑनलाइन – आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघाकडून ‘कमळ थाळी’ची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे. ही थाळी गरिबांसाठी असून अगदी मोफत मिळणार आहे.

सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्यामुळे गरीब लोकांची उपासमार होत आहे. त्यांना दिलासा म्हणून अनेक लोक काही ना काही करतच आहेत. तसेच सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नितेश राणे यांनीही त्या दृष्टीने एक पाऊल उचलले आहे. याच मतदारसंघात कणकवली नगरपंचायतीच्या सहकार्याने ‘कमळ थाळी’ योजना सुरु होत आहे. या योजनेअंतर्गत दररोज १५० लोकांना विनामूल्य जेवण दिले जाणार आहे. या योजनेमुळे गरिबांना नक्कीच मदत होईल, असे नितेश राणे म्हणाले.

काय मिळणार ‘कमळ थाळी’मध्ये?
२ मूद भात
२ चपाती
१ वाटी वरण/डाळ (आमटी)
१ भाजी

कुठे मिळणार ही थाळी?
लक्ष्मी विष्णू हॉल, विद्यानगर (संजीवन हॉस्पिटलजवळ), कणकवली येथे ही थाळी मिळणार असून दुपारी १२ ते २ या वेळेत ही थाळी मिळेल.

शिवभोजन थाळीला टक्कर
शिवसेनेने राज्यात १० रुपयात शिवभोजन द्यायला सुरुवात केली असून सध्या लॉकडाऊन असल्यामुळे तालुका स्तरावरही ही योजना सुरु आहे. अशात नितेश राणे यांनी कमळ थाळी योजना सुरु केली असून शिवभोजन थाळीला टक्कर देत असल्याची चर्चा सुरु आहे. शिवभोजन नंतर भाजपने ५ रुपयांमध्ये दीनदयाळ उपाध्याय थाळी सुरु केली असून त्यामुळे अगोदर पक्षाची एक योजना चालू असताना दुसरी योजना का याबाबत प्रश्न विचारला जात आहे.