Maharashtra Lockdown : किराणा मालाची दुकाने आता फक्त 4 तासच खुली राहणार, अजित पवारांचा मोठा निर्णय

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील अस्थापना सोडून इतर अस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. कडक निर्बंध असले तरी रस्त्यावरील वर्दळ कमी झालेली नाही तसेच रुग्णांची संख्या कमी होण्या ऐवजी वाढत आहे. निर्बंध असताना बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 पर्यंत मर्यादेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार) बैठक झाली. या बैठकीमध्ये किराणा मालाची दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्य़ंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे इत्यादी विषयांचा आढवा या बैठकीत घेण्यात आला.

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करा

कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदी प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तातडीने सुरु करावी. पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश अजित पवार यांनी दिले

ऑक्सिजन निर्मिती करणारे बंद संयत्र तातडीने सुरु करा

अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत. त्यांचा शोध घेऊन ती संयंत्रे तातडीने सुरु करावीत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकसचिव यांनी जिल्हा प्रशासन व मंत्रालयातील दूवा म्हणून जबाबदारी घ्यावी, असे निर्देश अजित पवार यांनी यावेळी दिले. याशिवाय निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत आहेत. त्यामुळे किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

राज्यात अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती करावी

आजच्या बैठकीमध्ये राज्यातील रुग्णालयात उपलब्ध खाटांचा, ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हीर औषध पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. तसेच येणाऱ्या काळामध्ये रुग्णवाढ झाल्यानंतर राज्याबाहेरून मिळणारा ऑक्सिजन कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती प्रक्रिया तात्काळ सुरु करावी. कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांच्या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्रकल्प स्थापन झाले आहेत. मुंबई पालिकेने देखील असा प्रकल्प निर्मितीसाठी कार्यवाही सुरु केली आहे. या तिघांनी विहित प्रक्रियेद्वारे खरेदी केलेल्या दरांना प्रमाण मानून नवीन ऑक्सिजन प्रकल्पासाठी खर्च करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.

राज्यात लवकरच रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध होईल

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. देशातील प्रमुख सात रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारला देखील विनंती करण्यात आली आहे. रेमडेसिवीर निर्मात्या कंपन्यांना क्षमता वाढीसाठी सहकार्य करण्यात येत आहे. लवकरच राज्याला पुरेसा रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच पुण्यातील ससून रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेड वाढवण्यात येईल. यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

किराणाच्या नावाखाली लोक बाहेर फिरत आहेत

किराणा दुकान दिवसभर उघडं असल्याने अनेकजण किराणा दुकानाच्या नावाखाली दिवसभर फिरत असतात. त्यासाठी अजित पवार यांनी सकाळी सात ते अकरा या कालावधीत किराणामालाची दुकानं उघडी ठेवूया असं सांगितलं. कारण दिवसभर किराणाच्या नावाखाली बाहेर फिरणं योग्य नाही. त्यामुळे अशा स्वरुपाचा बदल केला पाहिजे. विशेष म्हणजे वरुनच तो बदल व्हावा, जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर तो बदल ठेवू नये, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.