महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ असतानाच राज्य शासनाने १४ एप्रिलला राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. त्यानंतर काही दिवसापूर्वी त्या नियमात बदल करून आणखी कठोर निर्णय घेतला गेला. हा लॉकडाऊन १ मे पर्यंत लागू केला आहे. आता मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता १ मे नंतरही आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावरून मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊन वाढवण्याबाबत संकेत दिले आहेत. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

राज्याची कोरोनामुळे होणारी परिस्थिती पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्य सरकार १५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची चिन्हे दिसत आहे. यावरून टास्क फोर्सने म्हटलं होत की, राज्यातील लॉकडाऊन हा ७ दिवसांसाठी वाढवावा, दरम्यान, १३ मे रोजी रमजान ईद असल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे १५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवावा असे राज्यातील काही मंत्र्यांनी मत व्यक्त केले आहे.

या बैठकीमध्ये राज्यात १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरणाच्या निर्णयावर सुद्धा शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत. तर मोफत लस देण्याच्या प्रस्तावावर मी सही केली आहे. हा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत येणार असून त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. असे अजित पवार म्हणाले होते.