Maharashtra Lockdown : मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत; ‘… तर सर्वसामान्यांना Petrol, Diesel बंद’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने काल (बुधवार) रात्रीपासून लॉकडाऊनला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विरळ झाली होती. तर काही ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे पहायला मिळाले. लॉकडाऊन असताना देखील लोक गर्दी करत असल्याने राज्य सरकारकडून निर्बंध आणखी कडक करण्याचा विचार सुरु आहे. असे झाल्यास सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेल दिले जाणार नाही.

राज्याचे मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याचे संकेत देताना सांगितले की, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे दोन दिवसांत निर्बंध वाढवले जाणार आहेत. सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल दिले जाणार नाही. तहसीलदारांना पत्र दिल्यानंतरच फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन पुरवठा केला जाईल. यासंदर्भात राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

लोकल प्रवासाबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, लोकल सेवेचा वापर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच करता येणार आहे. इतरांनी लोकल सेवेचा वापर केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. लोकल सेवा वापरबाबतचे निर्बंध आणखी कडक करावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. परप्रांतीय कामगारांना त्यांना त्यांच्या मुळ गावी परतण्यासाठी सूट दिली आहे. त्याचा फायदा घेत काही खासगी आणि सार्वजनिक वाहतूक केली जात आहे. आम्ही आणखी एक दिवस जनतेला विनंती करत आहोत. अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.