Lockdown च्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘कोरोना रुग्णांचे आकडे कमी होत असले तरी लगेचच सर्व काही उघडणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र आता हा लॉकडाऊन 1 जूनपासून शिथील करणार की वाढवणार याबाबत व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांना उत्सुकता आहे. मात्र यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लॉकडाऊन आपल्याला हळूहळू उघडावे लागेल. कोरोना स्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. मागच्यावेळी लॉकडाऊन हटवल्यानंतर आकडे अचानक वाढले. आता आकडे जरी कमी असले तरी लगेचच सर्व काही सुरु होणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केेले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतले कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत असली तरी ते पूर्ण कशी कमी होईल याकडे आमचे लक्ष आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय आहे. प्रत्येक राज्याची मागणी आहे की आम्हाला जास्तीत जास्त लस द्या. तशी आमचीही आहे पण जसजशी लस उपलब्ध होतेय तसे लसीकरण केले जात आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत सगळ्यात जास्त लसी दिलेल्या आहेत. मुंबईत 227 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु आहे. ड्राईव्ह इन लसीकरण सेंटर सुद्धा सुरू आहेत. जेवढ्या लसी लवकर येतील तेवढ लसीकरण होईल. ग्लोबल टेंडरबाबत महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातल्या लसी बाहेर गेल्या नसत्या तर लसीकरण जास्त झाले असते, या जर तरच्या गोष्टी आहेत. मुंबई उपनगरचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर मुंबईत जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याची जबाबदारी आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. आपण 7 दिवसात मुंबईतील संपूर्ण लसीकरण करु. भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असत त्यांना ते करू द्या, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान राज्यातील 14 जिल्हे अजूनही रेड झोन असून तिथे कडक लॉकडाऊन लावावा अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. लोकल बंद असल्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबई लोकलवर काही दिवस निर्बंध लावावाच लागेल. 15 दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.