निलेश राणेंचे अजित पवारांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि तुम्ही…’

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्बंधांचे पालन नागरिकांकडून होताना दिसत नाही. तसेच रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षीसारखा कडक लॉकडाउन लावण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. अजित पवार आपण रोज लॉकडाऊनची धमकी देता, पुण्यात कोण तुमच ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव तरी वाचतील. लॉकडाउन हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही, अशी टीका राणेंनी केली आहे.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी वीकेंड लॉकडाउनबद्दल भाष्यं केले होते. कडक निर्बंध लागू करून नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाहीत. लोकांनी शनिवार आणि रविवार दोन दिवसांचा लॉकडाउन पाळला नाही, तर गेल्यावर्षीसारखा लॉकडाउन लावावा लागेल, असे मंत्रीमंडळातील सहकारी म्हणत असल्याचे पवार यांनी सांगितले होते. पवारांच्या या विधानावरूनच राणे यांनी टीकास्त्र डागल आहे. आपण रोज उठून लॉकडाउनची धमकी देता, पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे. नेतेगिरी कामात दाखवा असे म्हणत राणेंनी टीका केली आहे.