माढ्यामध्ये भाजपला मोठा दिलासा, ‘या’ नेत्याने दिला युतीला पाठिंबा

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी आणि भाजपने माढा लोकसभा मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची केली आहे. माढा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. त्यातच धनगर समजाचे नेते उत्तम जानकर हे माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाल होती. मात्र, त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगत युतीच्या उमेदवाराला म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. उत्तम जानकर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ही घोषणा केली. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

‘धनगर समाजाला जोपर्यंत जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही पद घेणार नाही. धनगर समाजाला भाजपच न्याय देऊ शकेल. मला आणि गोपिचंद पडळकर यांना तिकीट मिळावं अशी इच्छा होती. मी निवडणूक लढवू शकतो पण, निवडून येण्याची खात्री नाही. त्यामुळे समाजाचं हित भाजपबरोबर जाण्यात आहे, म्हणून मी युतीला पाठिंबा देत आहे,’ अशी घोषणा उत्तम जानकर यांनी केली आहे.

माढ्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांच्यामध्ये लढत होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची चार लाख मते आहेत. त्यामुळे उत्तम जानकर यांचा पाठिंबा भाजपसाठी फायद्याचा ठरणार आहे. दरम्यान, धनगर समाजाच्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उत्तम जानकर यांना समाजाकडून निवडणूक लढण्याचा दबाव आहे, असं सांगण्यात येत आलं होतं.