सांगली लोकसभेसाठी लढले तर राष्ट्रवादीकडूनच लढेल : स्मिता पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस आघाडीची वाटाघाटीची बोलणी आता अंतिम टप्प्यात असतानाच रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्यानंतर त्याबदल्यात राष्ट्रवादीला सांगली सोडण्याच्या चर्चेला आता वेग आला आहे. अशात राष्ट्रवादीने आपला उमेदवार देखील या मतदारसंघात तयार ठेवला आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांना राष्ट्रवादी निवडणुकीच्या रणात उतरवणार आहे. मात्र, स्वाभिमानीला ही जागा सुटल्यास त्या ठिकाणी स्वाभिमानीकडून देखील स्मिता पाटील यांना उमेदवारी करण्यासाठी गरळ घालण्यात येते आहे. मात्र, स्मिता पाटील यांनी याबाबत आपले स्पष्ट मत नोंदवले आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी करण्याची वेळ आली तर मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणूनच निवडणूक लढेल असे स्मिता पाटील यांनी स्पष्ट केले आहे. वसंतदादा पाटील यांच्या घराण्याला डावलण्यात आल्याचे सांगत सांगलीत चांगलेच राजकारण तापले आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसने लढण्याऐवजी हा मतदारसंघ मित्र पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगलीमधील राजकारण पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा मतदारसंघ आघाडीने आपल्याला द्यावा अशी मागणी केली आहे. आघाडी हा मतदारसंघ सोडण्यास अनुकूल आहे. मात्र, आघाडीतील मोठे पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हा मतदारसंघ आपसात वाटून घेण्याचे नवे समीकरण पुढे आणण्यास सुरुवात केली आहे. या राजकारणाला उतारा म्हणून स्वाभिमानीने देखील स्मिता पाटील यांना आपल्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्यासाठी विनवणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, स्मिता पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाव्यतिरिक्त अन्य पक्षाकडून उमेदवारी करण्यास ठाम नकार दिला आहे.