ईव्हीएम वरून पवार कुटुंबात मतभेद : अजित पवारांचे विधान चर्चेत 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जर खरंच ईव्हीएम मशीनमध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजपचा पराभव झाला नसता, त्यामुळे ईव्हीएमविषयी माझ्या मनात शंका नाही, असे विधान अजित पवार यांनी केलं आहे. याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली होती. त्यामुळे अजित पवार यांच्या आजच्या या विधानाने पवार कुटुंबातील ईव्हीएम विषयीचे मतभेद समोर आले आहेत.

संपूर्ण देशभरात विरोधकांनी या मशीनवर शंका उपस्थित करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शरद पवार यांनीही वेळोवेळी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे विरोधकांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती. मात्र त्याचवेळी अजित पवार यांनी क्लीनचिट दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शरद पवार आणि  ईव्हीएम
बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना ? अशी शंका शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी खाजगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत व्यक्त केली होती. त्याचवेळी  चंद्रकांत पाटील यांनी देखील आम्ही काहीही करून बारामतीची जागा जिंकणार असे म्हटल्याने या शंकेला जागा निर्माण झाली होती.

दरम्यान, जर अशा प्रकारे सत्ताधारी पक्ष निवडणूक जिंकणार असेल तर लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरून विश्वास उडेल, असेही त्यावेळी शरद पवार यांनी म्हटले होते.