‘कोणता नेता कुठंही गेला तरी काही फरक पडत नाही’ : बाळासाहेब थोरात

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेल्याने या ठिकाणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुजय विखे यांना भाजपने नगर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी दिली. यानंतर सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पक्षातीलच नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय यांच्या या निर्णयाचा राधाकृष्ण विखे यांनी सर्वप्रथम निषेध करायला हवा होता असे म्हटले होते. यामुळे विखे आणि थोरात यांच्यात शाब्दीक चकमक सुरू झाली.

आज राज्यातील चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील त्यांच्या जोर्वे गावात सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी सेना उमेदवाराच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. त्यामुळे शिर्डीची लढाई सेना विरुद्ध काँग्रेस अशी होण्याऐवजी विखे विरुद्ध थोरात अशी रंगली आहे. मतदान केल्यानंतर थोरात यांनी विखे पाटील यांच्यावर निशाणा साधत ‘कोणता नेता कुठंही गेला तरी काही फरक पडत नाही’ असे म्हटले आहे.

पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, कोणता नेता कशा पद्धतीने वेगळा वागायला लागला ते जनतेला आवडत नाही. कोणी कसे ही चालावे पण चालणाऱ्यांनी विचार धाराने चालावे या मताशी जनता असते. शिर्डी मतदार संघामधील जनता आपल्या पाठिशी राहणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.