चालले होते बारामतीची चर्चा करायला अन् आता ‘ही’ वेळ आली ; थोरातांचा महाजनांवर हल्लाबोल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अमळनेर येथे झालेल्या मारहाणीची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. या घटनेवरून विरोधी पक्षांनी डोकं वर काढत भाजपच्या मंत्र्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे. ‘गिरीश महाजन हे बारामतीची चर्चा करायला चालले होते. मात्र आता त्यांना गावातच वाद मिटवण्याची वेळ आली आहे’, अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘गिरीश महाजन यांना सध्या गती आहे. त्यामुळे अशी परिस्थिती आली असावी. अमळनेर येथील घटना ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत लांच्छनास्पद बाब आहे. गिरीश महाजन हे बारामतीची चर्चा करायला चालले होते. मात्र आता त्यांना गावातच वाद मिटवण्याची वेळ आली आहे’. असे थोरात म्हणाले. अमळनेर येथे झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याबाबत बोलताना थोरात म्हणाले, हा मारहाणीचा व्हिडीओ सुद्धा जास्त वेळ पाहावा वाटला नाही’. एकूणच काय अमळनेर येथे झालेल्या मारहाणीमुळे ऐन निवडणुका तोंडावर असताना विरोधी पक्षांना टीका करण्याची आयती संधी या प्रकरणामुळे मिळाली आहे.

नक्की काय आहे अमळनेर प्रकरण ?

अमळनेरमध्ये बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुरुवातीला उदय वाघ आणि बी. एस. पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मग या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. मंचावरच दोन्ही नेते भिडले. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बी. एस. पाटील यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. उदय वाघ यांच्या समर्थकांनी यावेळी स्मिता वाघ आगे बढो,अशी घोषणाबाजीही केली.

हा गोंधळ पाहता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्वत:चे प्राण धोक्यात घालत माजी आमदार पाटील यांचा जीव वाचविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना व्यसपीठावरुन खाली ढकलले. यावेळी त्यांनी अन्य कार्य़कर्त्यांनाही दूर केले. या हाणामारीत महाजन यांनी तत्परता दाखविली नसती तर मेळाव्यातच अघटित घटना घडण्याची शक्यता होती.