आता राष्ट्रवादीकडून भाजपाला धक्का ; भाजपचा ‘हा’ ज्येष्ठ नेता राष्ट्रवादीत

माढा : पोलीसनामा ऑनलाइन – माढा लोकसभा मतदारसंघ भाजप आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा केला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून राष्ट्रवादीला धक्के देण्याचे सुरू असतानाच राष्ट्रवादीने ‘पॉवर’ खेळी करून भाजपला मोठ्ठा धक्का दिला आहे. माळशिरस तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील यांना पक्षात घेऊन भाजपला धक्का दिला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून डावपेच आखले जात आहेत. भाजपकडून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना पक्षात घेऊन पक्षाची ताकत वाढवली जात आहे. अशातच राष्ट्रवादीने भाजपला जोरदार उत्तर देत सुभाष पाटील यांना आपल्याकडे खेचले आहे.

रणजितसिंह मोहिते पाटलांना भजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी केली. त्यांनी संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचून त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला. अखेर भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे या मतदारसंघात जोरदार लढत होणार आहे.

माढा लोकसभा मतदार संघामध्ये करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण, माण या विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. सहा विधानसभापैकी तीन मतदारसंघ राष्ट्रवादी आणि काँग्रेस कडे आहेत. तर शेकाप आणि शिवसेनेकडे प्रत्येकी एक मतदार संघ आहे. त्यामुळे माढ्याची जागा ही राष्ट्रवादीसाठी तुलनेत सोपी मानली जाते. २००९ साली शरद पवार यांनी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती.