विखे पाटलांच्या राजीनाम्यानंतर विरोधीपक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे ? ‘या’ बड्या नेत्याने दिले संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर मात्र राजकीय वर्तुळात हलचालींना वेग आला आहे. राजीनाम्यानंतर आता काँग्रेसचे विरोधीपक्षनेत्याचे पद कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, ‘विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार हे सांगता येणार नाही. विखे गेल्यावर काँग्रेस आमदारांची संख्या किती राहील, त्यावरून पुढील निर्णय घेण्यात येईल. सर्वात जास्त सदस्य कुणाचे राहतील याबाबतीत गणितं ठरणार आहेत’. असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडेही जाऊ शकते, याबाबतचे संकेत दिले आहेत.

विखेंचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारला

काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विखे-पाटील यांचा राजीनामा स्वीकारला. मात्र राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी २७ तारखेला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. ते नक्की काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारीही मिळविली. आता राधाकृष्ण विखे देखील भाजपत प्रवेश करणार याची चर्चा होती. तसेच अनेक करणांवरुन काँग्रेसच्या नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.आता लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराकरिता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सभा आयोजीत करण्यात आली आहे. मात्र ही सभा शिर्डी येथे होणार नसून या सभेचे आयोजन संगमनेर येथे करण्यात आले आहे. त्यावरून देखील विखेंचा पत्ता काँग्रेसमधून कट झाल्याची चर्चा होती. आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिलाआहे.