विखे पाटलांचा पत्ता कट ? काँग्रेसकडून स्पष्ट संकेत ; विखेंच्या जागेसाठी ‘या’ नेत्याची धडपड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर मध्ये बाळासाहेब थोरात आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराकरिता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सभा आयोजीत करण्यात आली आहे. मात्र ही सभा शिर्डी येथे होणार नसून या सभेचे आयोजन संगमनेर येथे करण्यात आले आहे. विखे पाटलांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात देखील संगमनेरचेच. त्यामुळे आता काँग्रेसकडून थोरात यांना नेतृत्व दिले जाणार का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाली आहे.

सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अद्याप तसे काही झाले नाही. मात्र या सगळया उलट -सुलट चर्चांमध्ये बाळासाहेब थोरातांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. अहमदनगर मध्ये एकीकडे विखे पाटील तर दुसरीकडे थोरात अशी २ मोठे प्रस्थ आहेत. या दोघांनाही मानणारा  एक ठराविक वर्ग आहे. त्यामुळे आता विखेंचा काँग्रेसमधील पत्ता कट होणार का ? आणि ही जागा थोरातांना मिळणार का ? अशा चर्चांना अहमदनगरात ऊत आला आहे. या सगळ्यासाठी निमित्त आहे ते राहुल गांधी यांच्या संगमनेर येथे होणाऱ्या महासभेचे.

अशोक चव्हाणांचा भरसभेत विखेंबाबत इशारा

पक्षविरोधात काम केल्यामुळे अब्दुल सत्तार यांची काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली आता विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतीत देखील लवकरच निर्णय होईल असा इशारा काँग्रेस प्रेदशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जालना येथील सभेत बोलताना दिला होता, जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता.२०) भोकरदन शहरात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत संकेत दिले होते.

बाळासाहेब थोरातांची नेतेपदासाठी धडपड

दरम्यान, नुकतीच राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखेंना बाजूला सारून नेते होण्याची बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेलाय, अशा शब्दात विखे पाटलांनी घणाघाती टीका केली. पक्षात असतानाही शिर्डी लोकसभेत पक्षाच्या बॅनरवरून वगळले. आता विखेंशिवाय पर्याय नाही, म्हणून पुन्हा माझा फोटो लावलाय, असंही विखे पाटल यावेळी म्हणाले.