विधानसभेसाठी तयारी करणाऱ्या रोहित पवारांचे ट्रोलरना उत्तर म्हणाले …

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान नातू रोहित पवार यांना विधानसभा निवडणुकीत उत्तरावण्याबाबत संकेत दिले. त्यानंतर याबाबत सोशल मीडियावर घराणेशाहीवरुन टीका करण्यात येत आहेत. मात्र या टीकांना खुद्द रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले,’सध्या पेड ट्रोलर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे अशा ट्रोलरकडे आपण लक्ष देणार नाही. कारण आपल्याला राजकारणात सक्रिय व्हायचंय. उलट मी ट्रोलर्सला आवाहन करतो की त्यांनी मी केलेल्या कामाची एकदा माहिती घ्यावी. त्यानंतर हेच ट्रोलर माझं कौतुक करतील,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे’.

विधानसभेसाठी ‘या’ ठिकाणाहून लढणार

विधानसभेसाठी जाण्याची इच्छा असल्याचे सांगत वरिष्ठ सांगतील त्या मतदार संघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘आपण आतापर्यंत सामाजिक जीवनात कार्यरत असताना अनेक भागात काम करत आहोत. त्यामुळे पक्षाकडून जिथे संधी मिळेल तिथून निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे,’ असं म्हणत रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे’.

पवारांच्या पिढ्या राजकारणात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय आहेत. तसेच त्यांचे पुतणे अजित पवार देखील राजकारणात आहेत आता पवारांची तिसरी पिढी देखील राजकारणाच्या आखाड्यात उतरत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातून उमेदवार म्हणून पवारांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राजकारणात एंट्री केली आहे. त्यानंतर आता विधानसभेसाठी रोहित पवार यांना उतरवण्याच्या तयारीत आहेत. रोहित यांनी देखील जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवले आहे.

रोहित पवार यांच्याविषयी

शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे पुत्र म्हणजे रोहित पवार. शिर्सुफळ-गुणवडी जिल्हा परिषद गटातून रोहित पवार सदस्य आहेत. तसेच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर अनेकदा रोहित पवार त्यांचा प्रचार करताना दिसले. तसेच पार्थ यांचे सोशल मीडिया हॅन्डल करण्याचे काम देखील रोहित यांनी केले होते. पार्थ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर रोहितचे काय ? अशा चर्चा राजकारणात रंगल्या होत्या मात्र विधानसभे साठी रोहित पवार यांना उतरवण्याच्या तयारीत शरद पवार आहेत.