गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पत्नीने तिच्या पतीकडे लहान मुलीला मिठाई खायला देण्यासाठी 5 रूपये मागितले होते. त्यानंतर पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण इतके टोकाला गेले, की त्या व्यक्तीने त्याच्या 20 महिन्यांच्या बालिकेची हत्या केली.
28 वर्षीय विवेक असे आरोपी पतीचे नाव आहे. विवेकची 20 महिन्यांची मुलगी रडत होती. त्यामुळे या मुलीला शांत करण्यासाठी विवेकच्या पत्नीने तिला मिठाई आणायचा विचार केला होता. त्यासाठी विवेककडे मिठाईसाठी 5 रुपये मागितले. याच 5 रुपयांमुळे या पत्नी-पतीमध्ये भांडण झाले. तसेच रागाच्या भरात विवेकने बाळाला घेतले आणि दरवाजावर अनेकदा आपटले. यामध्ये त्या बालिकेचा मृत्यू झाला.
बाळाच्या रडण्याचा त्रास
या बाळाच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले, की पती कामावरून घरी परतला. तेव्हा बाळ रडत होते. त्यानंतर पतीकडे 5 रुपये मागितले. पण पतीने सुट्टे पैसे नसल्याचे सांगितले. तसेच मिठाईसाठी बाळ सारखेच रडत होते. त्यामुळे विवेकला राग आला.
पायऱ्यांवर आदळले डोके
विवेकने 20 महिन्यांची मुलगी वैष्णवीला उचलले आणि तिला दरवाजाजवळ नेऊन आपटले. त्यानंतर पायऱ्यांवर डोके आपटले. जेव्हा मी त्याला हे थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मलाही मारहाण केली.
घटनेनंतर मुलीला तातडीने नेले रुग्णालयात
पतीने बाळाला मारहाण केली. त्यानंतर विवेकच्या पत्नीने बाळाला उप-जिल्हा रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पतीला अटक
या प्रकरणाची तक्रार तिरोदा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्याला अटक केली.