‘तुम्ही महाराष्ट्रात राहताय, मग आता हिंदी-उर्दू आणि इंग्रजी शाळेतही मराठी कम्पल्सरी’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सर्व शाळेमध्ये मराठी विषय अनिवार्य करणार अशी घोषणा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर अजित पवार पहिल्यांदाच आपल्या विधानसभा मतदार संघात म्हणजे बारामतीत आले होते. यावेळी त्यांचे बारामतीकरांकडून जंगी स्वागत करण्यात आले आणि त्यांना नागरी सत्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात अजित पवारांनी ही घोषणा केली.

अजित पवार या कार्यक्रमात म्हणाले की, राज्यातील सर्व शाळेंमध्ये मग ती कोणत्याही माध्यमाची शाळा असेल तेथे मराठी भाषा दहावीपर्यंत अनिवार्य करणार आहोत. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांचा पाठिंबा आहे. यावेळी अजित पवार यांनी भावूक होत बारामतीकरांचे आभार देखील मानले. बारामतीकरांनी मला खूप प्रेम दिलं. त्यांच्या प्रेमाची परतफेड या जन्मात होऊ शकत नाही. पवार म्हणाले की, पुढील पाच वर्षात खूप काम करायचं आहे. बारामतीसह पुण्याचा पाणीप्रश्न सोडवायचा आहे. बारामतीची पाणीपुरवठा योजना 120 कोटी रुपयांची होती, ती आता 200 कोटींची करण्यात आली आहे. बारामतीच्या मेडिकल कॉलेजला 200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 100 कोटी रुपये दिले आणि त्यानंतरच मी इथे बारामतीत आलो.

अजित पवार म्हणाले की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मदत दिली पाहिजे. दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे जे म्हणणे आहे ते आम्ही ऐकून घेतले आहे. मी, उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यामध्ये लक्ष घालत आहोत. नियमित कर्जफेड करणाऱ्या आणि दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मदत देण्यात येईल.

पोलिसांना चांगली घर देणार –
अजित पवार म्हणाले की, आम्ही मुंबई, पुणे बारामती अशा अनेक शहरातील पोलिसांनी चांगली घरे देणार आहोत, पोलिसांना 500 चौरस फुटांची घरे देण्यात येतील ज्यात दोन बेडरुम, किचन आणि हॉल असे असेल. पोलीस आधी हाफ पँट घालायचे, पवार साहेबांनी ती हाफ पँटमधून फुल पँटमध्ये आणले. आता बारामतीकरामुळे त्यांना चांगली घरं मिळतील.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/