चंद्रकांत पाटील यांचे विकासातील योगदान ‘शून्य’; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे टीकास्त्र

आजरा : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रकांत पाटील यांना काहीसुद्धा न करता दोन वेळा पदांवर संधी मिळाली. ते भाग्यवान आहेत. मात्र, या सगळ्याचा राज्याला तर सोडाच, कोल्हापूर जिल्ह्यालादेखील फायदा झाला नाही. त्यांचे विकासातील योगदान शून्य आहे, असे टीकास्त्र ग्रामविकासमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सोडले.

पुणे पदवीधर शिक्षक आणि शिक्षक मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस जिल्हा परिषद सदस्य जयंतराव शिंपी, उमेश आपटे, मुकुंदराव देसाई, वसंतराव धुरे, तानाजी देसाई, दिलीप लाड यांनी संबोधित केले. तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, विष्णुपंत केसरकर, नामदेव नार्वेकर, सुधीर देसाई, विद्याधर गुरबे, शिरीष देसाई, बशीर खेडेकर, रचना होलम, डॉ. राजलक्ष्मी देसाई, एम. के. देसाई, अनिकेत कवळेकर, अभिषेक शिंपी, रवि भाटले, जनार्दन बामणे, प्रकाश देसाई आदी यावेळी उपस्थित होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, “शरद पवार यांची राजकारण आणि समाजकारणात हयात गेली. दहा ते बारा वेळा लोकसभेच्या आणि तेवढ्याच विधानसभेच्या निवडणुका त्यांनी जिंकल्या. मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षणमंत्री व कृषिमंत्री म्हणून योगदान दिले. ते निश्चित मोठे आहेत. चंद्रकांत पाटील यांना काही न करता दोन वेळा मोठ्या संधी मिळाल्या,” असा चिमटा त्यांनी काढला.