Coronvirus Lockdown : पोलिसांवर किती ताण देणार, ते देखील माणसंच : जयंत पाटील

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पोलीस देखील एक माणूसच असून त्यांच्यावर किती ताण द्यायचा. घराबाहेर पडणार्‍या किती लोकांना पोलीस थांबवणार ? आपण स्वत: शिस्त पाळून सरकारला सहकार्य करावे अशी विनंती मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. राज्यातील जनतेशी त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.

कोरोनाचा विळखा वाढत चालला असल्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधीही बाहेर पडतो त्याच्यासोबत अनेक लोक बाहेर फिरतात. त्यांच्यासोबत असलेल्यांपैकी कोण पॉझिटिव्ह आहे हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपणच खबरदारी घ्यायला हवी आणि घरातच थांबायला हवे असा सल्ला पाटील यांनी दिला. आपल्याला काही होणार नाही असे समजून कोणीही घराबाहेर बाहेर पडू नका. बाहेर पडलेल्या किती जणांना पोलीस थांबावणार. पोलीस देखील एक माणूस आहे.

त्यामुळे आपणच घराबाहेर न पडणं योग्य आहे, असेही त्यांनी नमूद केले. शेतीविषयक काय उपाययोजना करता येतील यावर आम्ही संवाद साधला असून शेतीची काम बंद होऊ नये यावर सर्वांनी लक्ष केंद्रीत केले आहे. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समिती आम्ही सुरू केली. परंतु बाजार समितीतही लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. लोक त्या ठिकाणी गर्दी का करत आहेत हे समजत नाही. लोकांनी आपल्याला शिस्त लावून घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.