जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला सवाल, म्हणाले – ‘2022 मध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याला 2021 मध्ये परवानगी दिली कशी?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. असे असतानाही आयोजित केलेल्या कुंभमेळ्यावरून राजकीय नेत्यांसह अनेक कलाकार मंडळींनीही नाराजी दर्शवली होती. कुंभमेळ्यादरम्यान अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कुंभमेळा प्रातिनिधीक स्वरूपात आयोजित करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान कुंभमेळ्यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कुंभमेळ्याचे आयोजन दर 12 वर्षानंतर केले जाते. त्यानुसार कुंभमेळा 2022 मध्ये येतो, असे असताना केंद्र आणि राज्य सरकारने 2021 मध्ये कुंभमेळा आयोजित करण्याची परवानगी कशी दिली? असा सवाल उपस्थित केला आहे.

ज्यांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले त्यांनी मृत्यूंची आणि कोरोनाचा प्रसार झाल्याची जबाबदारी स्वीकारावी असे आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच आव्हाड यांनी आणखी एक ट्वीट करत नेपाळचे पूर्वीचे राजे ज्ञानेंद्र वीर विक्रम शाह देव आणि राणी कोमल यांना कोरोनाची लागण झाली असल्याचेही म्हटले आहे. ते महा कुंभमेळ्याला उपस्थित होते असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान मी हिंदू कुटुंबात जन्माला आलोय. हिंदू या नात्याने सांगू शकतो की कुंभमेळयाचे आयोजन करायलाच नको होते. देवाची कृपा की, आत्ता केवळ सांकेतिक झाला आहे. हा श्रद्धेचा मुद्दा आहे मान्य आहे. पण संपूर्ण जगात सध्या जी काही स्थिती आहे, ती बघता लोकांचा जीव अधिक महत्त्वाचा असल्याचे सोनू निगमने एका व्हिडीओद्वारे म्हटले होते.