राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यांना हवामान खात्याने WeekEnd ला दिला ‘ऑरेंज’ अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गुरुवारी मान्सूनचे आगमन झालं आहे. मात्र, अद्याप मुसळधार पावसाला सुरुवात झालेली नाही. पण शनिवारी आणि रविवारी या दोन्ही दिवशी पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वेधशाळेने महाराष्ट्र आणि कोकणातल्या 8 जिल्ह्यांना नारंगी इशारा जारी केला आहे.

मान्सून 13 जूनला महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. या दिवशी कोकणातली सर्व जिल्हे आणि कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी मुंबई, ठाणे, पुणे, नगर या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. रविवार पावसाचा दिवस असेल पण या दिवशी आठ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या भागात अति जोरदार पाऊस पडू शकतो. येत्या 15 तारखेपर्यंत नेऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

या 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ?
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी विदर्भात काही भागात पावसाने हजेरी लावली. सोमवारी देखील पुणे, नगर, नाशिकसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडू शकतो, असं भारतीय हवामान विभागाच्या मुंबई उपविभागाने जारी केलेल्या हवामान अंदाजात म्हटलं आहे.