महाराष्ट्रातील गडकिल्ले भाडेतत्त्वावर ? उभारण्यात येणार रिसॉर्ट, हेरिटेज हॉटेल्स, वेडिंग व्हेन्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (MTDC ) अशा 25 किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात. या किल्ल्यांवर फक्त हॉटेलच नाही तर विवाहस्थळ आणि मनोरंजन कार्यक्रमांची जागा म्हणूनही विकसित करण्याचा प्रयत्न असेल.

असा असेल किल्ल्यांचा संभाव्य विकास आराखडा –

राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भाड्याने देता येतील, अशा किल्ल्यांचा संभाव्य विकास आराखडा सरकारने तयार केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 60 ते 90 वर्षांसाठी करारावर दिले जाऊ शकतात. त्यासाठी पर्यटन विभाग हेरिटेज हॉटेल्स आणि चेन्सना निमंत्रित करणार असून त्यानंतर किल्ल्यांप्रमाणे निवड करण्यात येईल.

इतिहासकार तसंच गडप्रेमींकडून विरोध होऊ नये यासाठी सरकारचे धोरण-

शेजारील राज्ये राजस्थान आणि गोवामध्ये वाढलेलं हेरिटेज पर्यटन पाहता राज्य सरकारनेदेखील आपल्याकडे किल्ल्यांच्या सहाय्याने हेरिटेज पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न चालू केला आहे. राज्य मंत्रीमंडळाडून 3 सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. यानुसार एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकतं. मंत्रीमंडळाने पर्यटन विभागाला महसूल मिळवण्यासाठी दीर्घकालीन योजना आखण्यास सांगितलं आहे. यामुळे किल्ल्यांचे संवर्धन करणे सोपे होईल अशी सरकारला अपेक्षा आहे. महाराष्ट्रात सध्या 353 किल्ले असून जवळपास शंभर किल्ले या संरक्षित ऐतिहासिक वास्तू आहेत.

या निर्णयाला इतिहासकार तसंच गडप्रेमींकडून विरोध होऊ नये यासाठी सरकारने किल्ल्यांचा सौंदर्यात कोणतीही बाधा येणार नाही अशी कोणतीही गोष्ट केली जाणार नाही तसेच या किल्ल्यांवर कोणतंही बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. फक्त पर्यटनाला चालना देण्याचा हेतू नसून नव्या धोरणामुळे या वास्तू जतन करण्याचा मार्ग सापडेल, अशी आशाही पर्यटन विभागाने व्यक्त केली आहे.

सरकारच्या निर्णयाला विरोध –

ज्या गडकिल्ल्यांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्याचे संवर्धन करण्याऐवजी हॉटेलमध्ये रुपांतर करणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राजकीय व्यक्तींनीही ट्विटरवर या घटनेचा निषेध नोंदवला आहे.