… तर भाजप सत्तास्थापनेस तयार : सुधीर मुनगंटीवार

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीची मोट बांधली. त्यानंतर सत्ता स्थापन करत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. मात्र, शिवसेना पुन्हा सत्तेत येईल, ही भाजपची आशा अजून मावळलेली नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तसे बोलून दाखवले आहे.

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला तरी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून अडचण नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. नांदेडमध्ये एका विवाहसोहळ्याला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप सरकार स्थापनेसाठी तयार आहे. देर आये दुरूस्त आये, सुबह का भूला श्याम को आया असे समजून आम्ही समजून घेू. त्याचबरोबर मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही. पण समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भूमिका आहे. असे सांगत त्यांनी मनसेसोबत भाजपचे मत अनुकूल असल्याचेही अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलं.

दिल्लीच्या मातोश्री शक्तीशाली झाल्या
शिवसेना-काँग्रेसच्या आघाडीबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा देणं हे 21 व्या शतकातील आश्चर्यच आहे. अशोक चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते सत्तेत गेले. मुंबईच्या शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला आणि दिल्लीच्या मातोश्री शक्तीशाली झाल्या अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.