अमृता फडणवीस यांच्यावर टीका; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

0
57
Amruta fadanvis
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियावर व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रिय असतात. अनेकदा त्यांनी राज्यातील राजकारणावरही भाष्य, टिप्पणी केली आहे. अमृता फडणवीस (amruta-fadanvis) यांच्या या भूमिकेवरून अनेकदा त्यांच्यावर टीकाही झाली आहे. या सर्वांवर देवेंद्र फडणवीस (devendra-fadanvis) यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेले, तर त्यांनाही कुटुंब आहेत, असा इशारा दिला होता. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना नेत्यांवर निशाणा साधत उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, घरच्यांच्या संदर्भात जो काही विषय मांडला जात आहे. त्याबद्दल बोलायचे झाल्यास आम्ही कोणाच्याही घरच्यांवर टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. घरच्यांवरील टीकेबाबत बोलायचे झाले तर याचे सर्वांत मोठ उदाहरण मी स्वतः आहे. माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय लिहितात, काय बोलतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण मी त्याचा कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर देईन, असा पलटवार त्यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकांनंतर सेनेने भाजपसोबत युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. शिवसेनेच्या या निर्णयानंतर फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. त्यानंतर राज्यातील सत्ताबदलावर अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर ही त्यांनी आरे मेट्रो कारशेड, कंगना रणौत प्रकरण, अर्णब गोस्वामी यांची अटक आदी प्रकरणावर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेच्या नेत्यांनीही अमृता फडणवीसांच्या टीकेवर वेळोवेळी सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. तसेच अमृता यांच्या गाण्यांवरूनही त्यांना नेहमी ट्रोल केले जाते. या सगळ्या घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.