‘छत्रपती शिवरायांची उंची अत्युच्च, त्यावरून भांडण नकोच’ : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर येथील आयटी पार्क शेजारील पर्सिस्टंट सभागृहात ‘साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान’ च्या वतीने ‘मी पण जिजाऊ’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत निवेदिका रेणुका देशकर यांनी घेतली. या मुलाखतीत पुरंदरे यांनी माँसाहेब जिजाऊंचे चरित्र उलगडले.

बाबासाहेब पुरंदरे यांनी स्पष्ट केले की जिजाऊ माँसाहेबांच्या प्रेरणेनेच शिवरायांनी नवनिर्मितीचा ध्यास घेऊन स्वराज्य स्थापन केले. शिवरायांना घडवण्यामागे जिजाऊंचे मोठे योगदान असून शिवरायांच्या पराक्रमांनी आणि बुद्धिचातुर्याने स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांच्या चरित्राने फक्त भारतीयांनाच नव्हे, तर इंग्रजी लेखकांनाही भारावून सोडले. ‘शिवरायांची उंची ही अत्युच्च आहे, मात्र आपण त्यांच्या पुतळ्याच्या उंचीवरून भांडत असतो’ अशी खंत देखील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.

यावेळी पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथाही सांगितल्या. तसेच या कार्यक्रमात वयाची ८१ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रभाकर मुंडले यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान’ च्या वतीने साहित्य प्रसार केंद्राचे संस्थापक राजाभाऊ कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यगौरव पुरस्कार देण्यात येत असतो. या वेळेस या पुरस्काराच्या मानकरी मनीषा क्षीरसागर या ठरल्या आहेत. या कार्यक्रमाला पर्सिस्टंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर बेंद्रे देखील उपस्थित होते.

दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, माँसाहेब जिजाऊंना माहेरी जिजाऊ साहेब म्हटले जायचे. कारण त्या काळात घराण्यात साहेब म्हणण्याची प्रथाच होती. जिजाऊ माँसाहेबांना शस्त्रास्त्राचे ज्ञान अवगत होते. परंतु प्रत्यक्ष लढाई केल्याचे इतिहासात कुठेच सापडत नाही असे पुरंदरे म्हणाले.

पुरंदरे यांनी शहाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास देखील यावेळेस सांगितला आणि जेव्हा शहाजी महाराजांना बादशहाने पकडले तेव्हा जिजाऊ माँसाहेबांपुढे ‘सौभाग्य की स्वराज्य’ असा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी वडील आणि राज्य वाचविण्याचे कसब शिवाजी महाराजांमध्ये होते आणि शिवरायांनी आपल्या बुद्धिचातुर्याने अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखविल्या असे पुरंदरेंनी सांगितले. तसेच आजच्या युवकांना व्यसनाच्या अधीन जाऊ नका असा संदेश त्यांनी बोलताना दिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like