ब्लॅकमेलिंगला कंटाळून 20 वर्षीय तरूणीची आत्महत्या ; 38 वर्षीय आरोपीला अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नासाठी ब्लॅकमेलिंग केले जात असल्याच्या त्रासाला कंटाळून रोशनी हिरे या तरूणीने आत्महत्या केल्याची घटना नाशिक येथे घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शिवाजी केदारे याला बेड्या ठोकल्या आहेत. रोशनी हिरे हिने शहरातील आसाराम बापू पुलावरून गोदावरी नदी पत्रात उडी घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी रोशनीच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात शिवाजी केदारे याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

रोशनीचे २० जून रोजी लग्न होणार होते. मात्र, आरोपी रोशनिला माझ्याशी लग्न कर म्हणून त्रास देत होता. त्याच्याकडे रोशनीचे काही फोटो होते. याद्वारे तो तिला ब्लॅकमेलिंग करत होता. त्याच्याकडून होणा-या त्रासाला कंटाळून रोशनीने रविवारी (दि.२) आत्महत्या केली. आरोपी शिवाजी हा रोशनिला त्रास देऊन आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत होता. यापूर्वी दोन लग्न झाले असताना देखील तो रोशनीकडे लग्नाची मागणी करत होता.

आरोपीने रोशनी सोबत लग्न व्हावे यासाठी तिचे दोनवेळा ठरलेले लग्न मोडले होते. रोशनीचे ज्या मुलासोबत लग्न होणार होते त्या मुलाला आपले रोशनी सोबत प्रेमसंबंध असल्याचे खोटे सांगितले. त्यामुळे हे लग्न मोडले होते. अखेर नैराश्येतून रोशनीने आपले जीवन संपवले.

You might also like