राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणतात – ‘अजित पवार हेच आमचे CM’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री, असे मत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण, लवकरच राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी होणार आहे. यासाठी अनेक नेत्यांनी आपआपल्या पक्षात मजबूत फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांना मंत्रिमंडळात कोणती जबाबदारी मिळणार यावरही चर्चा सुरू असताना बनसोडे यांनी केलेले वक्तव्य हे अजित पवारांना उपमुख्यमंत्री करा, अशी मागणी करणारे असल्याचे बोलले जात आहे.

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १३ मंत्री शपथ घेणार आहेत. तर काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. यात आपली वर्णी लागावी म्हणून अनेक नेते, आमदार सक्रिय झाले आहेत. पत्रकारांनी आमदार अण्णा बनसोडे यांना मंत्रिपदाबाबत विचारले असता त्यांनी माझे जाऊ द्या, अजित पवार हेच आमचे मुख्यमंत्री, असे मत व्यक्त केले. अजित पवार यांच्या प्रयत्नामुळेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना त्वरीत सातवा वेतन आयोग लागू झाला असल्याचेही बनसोडे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. या निर्णयास राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बनसोडे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावे, ही राज्यभरातील कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे म्हटले आहे. मला तर वाटते, अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे.

मात्र, मला वाटून काय होणार. पक्षाचे सर्व निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतात. त्यांचा निर्णय माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांना मान्य असणार आहे, असे खासदार कोल्हे यांनी म्हटले आहे. दरम्यान, बनसोडे यांनीही अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री करा, अशी अप्रत्यक्ष मागणी केल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/